top of page

व्यंगचित्रांची 'मोहिनी'

भारतात व्यंगचित्रकलेचं रोपटं ब्रिटिशांनी लावलं. त्याला खतपाणी घालून वाढवण्याचं काम मात्र भारतातल्या व्यंगचित्रकारमंडळींनी केलं. या बाबतीत महाराष्ट नेहमीच अग्रेसर राहिला.

 

'हंस' - 'मोहिनी'सारखी अग्रगण्य मासिकं आणि अनंत अंतरकरांसारखे दिग्ग्ज संपादक असं अनुकूल खतपाणी मिळत गेलं, आणि व्यंगचित्रकलेचा या छोट्याशा रोपट्याचा रूपांतर डेरेदार वृक्षात होऊ लागलं. व्यंगचित्रकलेला थेट मासिकाच्या मुखपृष्ठावर आणण्याचं धाडस त्या काळी कै. अनंत अंतरकर यांनी केलं. शी. द. फडणीस यांच्यासारखे समर्थ व्यंगचित्रकार त्यांना लाभले; आणि अंतरकर-फडणीस या 'युती'नं महाराष्ट्यातल्या रसिकांच्या हृदयावर राज्य केलं. या संपादक-व्यंगचित्रकार युतीनं पुढे अनेक दिग्गज व्यंगचित्रकांची भर पडून ही युती पुढे 'महायुती' झाली.

या महायुतीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावण्याऱ्या व्यंगचित्रकारांच्या श्रेयनामावलीत एक नाव सातत्यानं डोळ्यापुढे येत. ते म्हणजे बाळ राणे ! त्यांचं घरगुती नाव 'दादा'. बाळ राण्यांनी पन्नास ते सत्तरच्या दशकात मराठी घरांमधून आनंदाची कारंजी उडवली. थोडक्यात सांगायचं तर त्यांचं व्यंगचित्र कोणत्याही महिन्यात प्रसिद्ध होणाऱ्या मासिकात, नियतकालिकात पाहिलं की मराठी रसिकाला 'दिवाळी-अंक' पहिल्याच आनंद मिळायचा. 'हंस' आणि 'मोहिनी' मासिकांतून प्रसिद्ध झालेली त्यांची अशीच काही उल्लेखनीय व्यंगचित्रं आपल्याला दिवाळीचा आनंद द्विगुणित करतील.

किचनमध्ये राबवणारा नवरा आणि ऐषआरामी पत्नी या त्यांच्या व्यंगचित्रातला आवडता विषय. असेच एक पतिराज ऑफिसातून थकूनभागून आलेयत आणि किचनमध्ये पोळ्या लाटतायत... त्याच वेळी गणितातील प्रॉब्लेम त्यांचे चिरंजीव त्यांना विचारतायत. मात्र या वेळी त्यांची पत्नी हॉलमध्ये पलंगावर आरामात बसून 'आदर्श गृहिणी' हे पुस्तक वाचतेय, आणि तिथूनच ती आपल्या चिरंजीवांना बाबांना त्रास न देण्याचा सल्ला देतेय! 

'हंस' दिवाळी-अंकातलं हे निःशब्द व्यंगचित्र पहा. खरेदी-यात्रेहून परतणारे पतिपत्नी. खरेदी केलेल्या जिनसांचे खोके अर्थातच पतिराजांच्या हातात आहेत. हातात फक्त पर्स घेतलेली पत्नी त्यांच्या मध्ये ऐटीत उभी आहे. इतकंच काय, पण ती दारावरची केलं वाजवायचीदेखील तसदी घेत नाही. बिच्चारे पतीराज दोन्ही हातातली खरेदीची खोकी सावरत चक्क नाकाचा वापर केलं वाजवण्यासाठी करतायत! कुठलाही भाषक या वेंचित्रांचा आनंद अगदी सहज घेऊ शकेल, इतकं हे बोलकं व्यंगचित्र.
Cartoonist Bal Rane
Cartoonist Bal Rane
१९५६च्या 'मोहिनी' दिवाळी-अंकात आलेलं हे व्यंगचित्र मानवी मानाचं यथार्थ चित्रण करणारं आहे. 'वशिकरण-यंत्रा'ची विक्री करणारा प्रो. धन्वंतरी नावाचा महाभाग त्याच्यासमोर हातापायाला बॅंडेज लावून बसलेल्या ग्राहकाशी संवाद साधतोय - "आमच्या यांचा तुमच्या मंडळींवर काहीच प्रभाव पडला नाही म्हणता ते कशावरून?" अंधश्रद्धेवर हसतखेळत घणाघाती टीका करणारं हे व्यंगचित्र आजच्या काळातदेखील आपल्या समाजाच्या मानसिकतेला तंतोतंत लागू पडत.

ऑफिसमध्ये आपली किती 'वट' आहे, अन साहेबांवर आपला किती वाचक आहे हे दाखवणारे हे एक नवरोजी पहा. त्यांच्या पार्श्वभागावर बुटाच्या लाथेचा ठसा उमटलेला दिसतोय, तरीदेखील ते कचेरीतुन परतल्यावर आपण नोकरीवर बाणेकरपणे लाथ मारून असे आलो अन साहेबाची कशी जिरवली त्यांचं रसभरीत वर्णन सांगतायत!

मोटारगाडीचं गारुड फार पूर्वीपासून आपल्याला भुलवतंय. पन्नासच्या दशकातलं हे व्यंगचित्रच पहा ना :

 

एक संस्थानिक महोदय पालखीतून प्रवास करतायत... पालखीचा प्रवास एकाएकी हा थांबला ते पाहण्यासाठी ते पालखीतून बाहेर डोकावतायत... पालखी वाहून नेणाऱ्या दोघांपैकी एका भोयानं आपला एक दुखावलेला पाय (अर्थातच काटा लागून) एका हातात उचलून धरलाय अन तो म्हणतोय (मोटारगाडीच्या परिभाषेत) "काही नाही, जरा पंक्चर झालं साहेब!"

'ऑफिसमधले विनोद' हा बाळ राणेंच्या व्यंगचित्रांचा आणखी एक आवडता विषय. कागदपत्रं ठेवायचे ऑफिसमधले लॉकर्स किती खोल असतात पाहा. महत्वाची कागदपत्रं लोकरमधून शोधून काढायच्या नादात साहेबाची सेक्रेटरी अर्ध्याहून अधिक लॉकरमध्ये गेलीय - नव्हे, ती चक्क लोकरीच्या खणात अडकलीय! तिची दया येऊन साहेब म्हणतोय, "सापडत नसेल तर जाऊ द्या हो इतकी काही आत्ताच जरुरी नाही त्या कागदांची!"

Cartoonist Bal Rane
Cartoonist Bal Rane

अगदी छोट्याछोट्या गोष्टींमध्ये काही केला हास्यस्फोटक विनोद कसा दडलेला असतो त्याच हे एक उत्कृष्ट उदाहरण :

स्टीलचं अवजड कपात उचलून नेणारे तीन हमाल. एकजण उंचपुरा. दोघे उंचीनं फारच कमी. पण या नैसर्गिक वैगुण्यावर मात करत अवजड लोखंडी काडत वाहून नेण्याचं काम ते किती कल्पकतेनं करतायत पाहा! हे शब्दविरहित व्यंगचित्र पाहून चेहऱ्यावर हसू न फुटेल असा रसिक विरळाच!

इंग्लंडमधून त्या काळी प्रसिद्ध होणाऱ्या 'पंच' या नियतकालिकाची आठवण करून देणारं हे आणखी एक व्यंगचित्र उत्कृष्ट रेखाटन आणि हास्यस्फोटक कल्पना यांचा मनोहारी संगम झालेला या चित्रात आपल्याला आढळेल.


घरात आलेला पाहुणा सोफ्यावर बसलाय, घरात पाळलेला कुत्रा थेट त्या पाहुण्याच्या डोक्यावर ऐटीत शेपूट हलवत बसलाय, आणि घराच्या मालकीणबाई पाहुण्यांना म्हणतायत, "त्यांच्या जागेवर बसला आहात तुम्ही इकडे बसा ना!"

व्यंगचित्रासाठी अगदी वेगळी विषय आणि त्याची आगळी मांडणी यामुळे भावणारं हे व्यंगचित्र अगदी 'हटके' वाटतं. झाडांना विविध आकार देणारे एक माळीबुवा एका झाडाला थेट पलंगाचा आकार देऊन त्याच्यावर झोपण्यासाठी सज्ज झालेयत! थोडक्यात, व्यंगचित्रांचे विषय अगदी छोट्याछोट्या गोष्टींमध्ये, क्षुल्लक वाटणाऱ्या घटनांमध्ये दडलेले असतात. गरज असते ती फक्त बाळ राण्यांसारख्या 'वेगळा' चष्मा वापरणाऱ्या कल्पक व्यंगचित्रकाराची!

लेखक: विकास सबनीस 

प्रकाशक: मोहिनी

दिवाळी २०१४

  • Facebook
  • Instagram
  • Youtube

© 2024 by Pratibha Rane-Wagh

bottom of page