
बाळ राणे (जेष्ठ व्यंगचित्रकार)

व्यंगचित्रकार बाळ राणे यांना, आपण व्यंगचित्रकार कसे झालात? असा प्रश्न कोणी विचारला की मिश्किलपणे हसत, चांगली चित्रे काढायला जमली नाहीत म्हणून! असे उत्तर देत.
२६ जानेवारी १९१४ रोजी कोकणातील कणकवली जवळच्या जानवली गावात बाळ राणे यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच चित्रकार व्हायचे त्यांचे स्वप्न होते. मुंबईत येऊन मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
मुंबईत सुप्रसिद्ध चित्रकार स. ल. हळदणकर यांच्याकडे ते चित्रकला शिकायला जात होते. त्यांच्या एका चित्राला, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया चे अवॉर्ड देखील होते. त्यांनी वॉटरकलर आणि ड्राय पेस्टल या दोन माध्यमांचा एकत्रित उपयोग करून सुंदर निसर्गचित्रे, प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन केली होती. मॅट्रीक झाल्यानंतर, कशाला कागदांची नासाडी करतो? असे वडिलांनी दटावल्यामुळे चित्रकार हळदणकर यांचा क्लास सोडवा लागला.
त्यानंतर पोलीस कमिशनरच्या ऑफिस मध्ये कारकूनाची नोकरी करू लागले आणि तेथूनच सेवानिवृत्त झाले. अशा रुक्ष वातावरणात दिवसभर नोकरी करूनही त्यांनी आपली व्यंगचित्रकला जोपासली. रोज सकाळी कचेरीत जाण्यापूर्वी ते तास दीड तास व्यंगचित्र काढत. घरातून बाहेर पडताना, त्यांच्यासोबत नेहमी एक व्यंगचित्रांचे पुस्तक असे. कधी कधी सुचलेल्या कल्पना, बसच्या तिकीटावरही नोंद करून ठेवत. किर्लोस्कर, मनोहर यासारख्या मासिकांनी आयोजित केलेल्या व्यंगचित्र स्पर्धांमध्ये त्यांना पारितोषिके मिळाली. श्रीयुत बाळासाहेब ठाकरे, शंकर्स विकली चे सर्वश्री शंकर, शि. द. फडणीस, बोरगावकर, आर. के. लक्ष्मण, मारिओ मिरांड आणि चित्रकार दलाल हे त्यांचे आवडते व्यंगचित्रकार होते. तसेच त्यावेळच्या तरुण व्यंगचित्रकारांमध्ये विकास सबनीस, ज्ञानेश सोनार, खलील खान हे व्यंगचित्रकार होते. दैनिक मराठा चे त्यावेळचे संपादक प्र. के. अत्रे यांना व्यंगचित्रे पाठवली असताना, त्यांनी कल्पना छान आहेत, रेषेत सुधारणा हवी असे सांगितल्यावर खूप मनावर घेऊन विविध व्यंगचित्रांचा अभ्यास करून त्यांनी स्वत:ची खास शैली निर्माण केली. वयाच्या तिशी नंतर, त्यांची व्यंगचित्रे मोठ्याप्रमाणात प्रसिद्ध होऊ लागली.
बाळ राणे यांच्या व्यंगचित्रात प्रामुख्याने कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, प्रत्यक्ष घटनांवरील, पूर्णपणे काल्पनिक वातावरणातील विषय आढळतात. मराठी मधील मनोहर, किर्लोस्कर, हंस, वसंत, मोहिनी, उद्यम, वाङ्मयशोभा, रम्यकथा, वसुधा, आवाज, जनशक्ती, बुवा, वीणा, दीपावली, साप्ताहिक, रूपा, प्रभा, कपोत, अबकडई, श्री, मार्मिक आणि लहान मुलांचे किशोर अशा अनेक मासिके आणि दिवाळी अंकात त्यांची व्यंगचित्रे सातत्याने प्रसिद्ध होत होती. मराठी खेरीज इंग्रजीतील शंकर्स विकली, हिंदीमधील धर्मयुग, गुजराथीमधील जी, बीज आणि चित्रलेखा या मासिकांमधूनही त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली.

१९५० सालची व्यंगचित्रे पाहिली कि रेषांमध्ये सहजता जाणवत नाही पण नंतर मात्र खूपच सहजता येऊ लागली. डोळ्यासाठी काढलेला एक ठिपका आणि भुवई यामधून अनेक प्रकारचे हावभाव ते थोडक्यात दाखवीत. त्यांच्या व्यंगचित्रातून लहान मुले, सुंदर तरुणी, पोक्त स्त्री-पुरुष आणि वृद्ध माणसे या प्रत्येकाच्या वयातील फरक प्रभावीपणे चित्रित होत असे. जाड बारीक रेषांमधून परस्पेक्टिव्ह आभास, कमीतकमी रेषांचा वापर करून विषय आणि चित्रणाला योग्य न्याय देत. त्यासाठी ते सातत्याने स्केचिंग करत. राजकीय नेत्यांची चित्रे हुबेहूब काढण्यासाठी नियमितपणे सराव करत. ब्रश, काळी शाई, क्रुकविल पेन आणि आर्ट पेपर हे त्यांचे माध्यम होते.

दैनिक तरुण भारत (पुणे आणि नागपूर) या मध्ये बाळूकाका हे पॉकेट कार्टून जवळ-जवळ पस्तीस वर्षे रोज नियमितपणे प्रसिद्ध होत होते. तसेच संध्याकाळ दैनिकातही काही वर्षे त्यांची चित्रे प्रसिद्ध होत होती. दैनिक पेपर वाचून राजकीय आणि सामजिक घडामोडींवर तीन ते चार चित्रांचा संच ते मुंबईहून पुण्याला पोष्टाने पाठवीत असत त्यात कधीही खंड पडला नाही. दैनिकातील विनोद हा तत्कालीन असे. त्या काळातील त्यांची दिवाळी अंकातील चित्रे अजूनही आनंद देतात. तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रातून दिसते. चुटकुले विरहित अनेक चित्रे त्यांनी काढली आहेत त्याचा आनंद अशिक्षित आणि कोणत्याही भाषेची व्यक्ती घेऊ शकते. असंख्य व्यंगचित्रांच्या कल्पना त्यांना सुचल्या याचे कारण ते सतत त्यावर चिंतन करीत असत. अनेक परदेशी व्यंगचित्रकारांच्या चित्रांचा अभ्यास करीत.

चित्रकला, व्यंगचित्रकला या खेरीज कुक्कुट पालन या विषयावरची पुस्तके अभ्यासून त्यांनी कोंबड्या पाळल्या होत्या. गावाला काजूची १०० कलमांची लागवड केली होती, तीही अभ्यासपूर्ण. टॅक्सीडर्मी (मृत प्राण्यांमध्ये पेंढा भरणे) याचा देखील अभ्यास त्यांनी केला होता. ते उत्तम खवय्ये होते, त्यांच्या एका डायरीत अनेक पदार्थांच्या रेसिपी लिहिलेल्या होत्या. ते सुंदर बासरी, हार्मोनियम व व्हायोलिन वाजवीत. सेवानिवृत्त झाल्यावर ‘फोटोग्राफीचा’ शाश्त्रशुद्ध अभ्यास सुरु केला. स्वयंपाकघरातच डार्करूम केली होती. रोज रात्री तिथे ‘डेव्हलपिंग, प्रिंटींग, एनलार्जिंग’ हे विविध प्रयोग करीत असत.
आपली निवडक व्यंगचित्रे पुस्तकरूपाने प्रकाशित व्हावीत अशी त्यांची इच्छा होती, ती पूर्ण व्हावी ही सदिच्छा!


त्यांनी काढलेले असंक्य फोटोस, २५ व्यंगचित्रांची स्केत्चबुकस, आर्ट पेपरवरील शाई मधील चित्रं, प्रसिद्ध झालेली छापील चित्रं त्यांच्या कन्या सुप्रसिद्ध चित्रकर्ती प्रतिभा राणे-वाघ यांनी जपून ठेवले आहेत. बाळ राणे यांच्या जन्मशताब्दी निमित्य २०१४ साली या चित्रसंग्रहाचे प्रदर्शन सर. ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयात भरविले होते. त्यामुळे, नव्या पिढीस त्यांची व्यंगचित्रे पाहायला मिळाली.

