
कलासाधना

कलेचा ध्यास लागलेला कोणताही कलाकार आपल्याच प्रतिभेचे नानाविध अविष्कार पाहून सुखावून जातो. चित्रकला ही देखील तशीच एक कला असून रंगांच्या दुनियेत चित्रकार देहभान विसरून जातो. अनेक अडचणीतून मार्ग काढीत प्रतिभा राणे-वाघ यांनी आपली कला सदैव जोपासली आणि आज अनेक वर्ष, ते “संचित” कलाप्रेमी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करीत आहेत.
स्नेहलता आणि बाळ राणे यांची सुकन्या प्रतिभा राणे-वाघ यांचा जन्म ११ मे, १९५५ रोजी मुंबई येथे झाला. प्रतिभा यांचे वडील बाळ राणे (१९१४-१९८२) एक ख्यातनाम व्यंगचित्रकार होते. खरं तर त्यांना चित्रकार व्हायचं होतं. परंतु घरून विरोध झाल्यामुळे त्यांना नोकरी करावी लागली. सुप्रसिद्ध चित्रकार स. ल. हळदणकर यांच्याकडे चित्रकला शिकत होते.
चित्रकला ही वारसाहक्काने आपल्याकडे आली असं प्रतिभा राणे-वाघ मानतात आणि त्या म्हणतात, “मला वडिलांकडूनच चित्रकलेसाठी खूप उत्तेजन मिळालं. आम्ही दरवर्षी मे महिन्यात कणकवलीला आमच्या गावी जात असू. लँडस्केप करायला मी तिथेच शिकले. मी चित्रकलेच्या क्षेत्रात येणार हे जवळजवळ निश्चितच होतं. त्यामुळे जे. जे. स्कुल ऑफ आर्ट मध्ये मी शिक्षण घेतलं. दोन वर्षांचा कलाशिक्षकाचा डिप्लोमा पूर्ण केला व विले-पार्ले येथील प्रार्थना समाज हायस्कुल मध्ये कलाशिक्षिका म्हणून नोकरी केली. तसेच नोकरी सांभाळून एम. ए. (प्राचीन इतिहास) ची पदवी मिळवली आणि जे. जे. स्कुल ऑफ आर्ट मध्ये व्हिसीटींग लेक्चरर (कलेचा इतिहास) म्हणून काही वर्ष काम केलं.”



दोन वर्षाच्या आर्ट टीचर्स डिप्लोमामुळे चित्रकलेचा सखोल अभ्यास झाला नाही अशी खंत वाटत राहिल्यामुळे, विवाहानंतर मुलगा थोडा मोठा झाल्यावर त्यांनी शाळेतून तीन वर्षांची विनावेतन रजा घेऊन, रहेजा स्कुल ऑफ आर्ट (मुंबई) मधून चित्रकलेत जी. डी. आर्ट डिप्लोमा करायचा त्यांनी ठरवलं आणि त्यासाठी पती श्री. लक्ष्मण वाघ यांचा ही पाठिंबा मिळाला. त्यावेळचा अनुभव सांगताना प्रतिभा म्हणतात, "पहिल्याच दिवशी जेव्हा मी वर्गात पाऊल टाकलं तेव्हा तेथील २०-२२ वयोगटातील विद्यार्थ्यांनी मात्र टीचर समजून माझं स्वागत केलं. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस अवघडल्यासारखं झालं खरं, परंतु नंतर मी त्यांच्यात पूर्ण रमले."
करिअरची सुरुवात
प्रतिभा राणे-वाघ यांनी जी. डी. आर्ट डिप्लोमाच्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथमश्रेणीत सातवा क्रमांक मिळवला आणि रहेजा स्कुल ऑफ आर्टच्या वार्षिक कलाप्रदर्शनात उत्कृष्ट कलाकृतीचे प्रथम पारितोषिक मिळवले. रहेजा स्कुल ऑफ आर्ट मध्ये लेक्चरर या पदासाठी निवड झाली. याच कालखंडात नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (मुंबई) यांनी त्यांच चित्र (फ्लेम ऑफ फ्रीडम) संग्रहासाठी घेतले. महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन, बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि इतर अशा बारा पारितोषिकांनी त्यांना सन्मानित केले आहे. त्यात विशेष उल्लेखनीय 'अखिल भारतीय कालिदास अवॉर्ड' आणि मेक्सिको येथील जागतिक स्पर्धेतील प्रथम पारितोषिके आहेत.
२००६ मध्ये, भारतीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालय विभागाने 'चित्रकथी' या महाराष्ट्रामधील लुप्त होत चाललेल्या लोकचित्रकले संदर्भात संशोधन करण्यासाठी 'दृश्य कलामधील वरिष्ठ फेलोशिप' प्रदान केली. हे प्रतिभा राणे-वाघ यांचे प्रेरणास्रोत आहे. मधुबनी, वारली, चित्रकथी, चर्मबाहुल्या अशा वेगवेगळ्या लोकचित्रकलेचा त्यांनी तपशीलवार अभ्यास केला आहे आणि त्याचा प्रभाव त्यांच्या कलाकृतीत जाणवतो. त्या सतत नवनवीन प्रयोग करीत असतात.
या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या मुलांना त्या सांगू इच्छितात की, "पैसे मिळवणं आणि प्रसिद्धी प्राप्त करणं या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. झटपट प्रसिद्धीच्या मागे लागणाऱ्यांना कदाचित भरपूर पैसा आणि झटपट मिळालेली प्रसिद्धी फार काळ टिकत नाही. म्हणूनच खऱ्या अर्थाने कलावंत व्हायचं असेल तर त्यासाठी कलेची दीर्घकाळ साधना करणे आवश्यक आहे."
आपल्या विशिष्ट कलाशैलीमुळे प्रतिभा राणे-वाघ यांनी कलाक्ष्रेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्या आता सेवानिवृत्त असून मुंबई येथे कलासाधना करीत आहेत.

नाव: फ्लेम ऑफ फ्रीडम | माध्यम: पेपरवर रंगीत शाई
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबई येथे संग्रहित
प्रेरणात्मक चित्रकर्ती
लोक-कलेनी प्रतिभा राणे-वाघ यांना नेहमीच प्रेरित केले आहे. या चित्रातील मुक्ताविष्कार, आत्मविश्वासपूर्वक मारलेले रंगांचे फटकारे, सुंदर रंग-संगती, रेषेतील सहजता पाहून, आपल्यालाही असं चित्र काढता यावे असे प्रतिभा यांना आजही वाटते. दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या, दगड फोडणे, लाकडे तोडणे, मोलमजुरी करणे, शेतीची कामं करणे, घर, संसार, मुलं-बाळं हे सगळे व्याप सांभाळून सातत्याने कलानिर्मिती करणाऱ्या या आदिवासी स्त्रियांबद्दल प्रतिभा यांना नेहमीच आदर वाटतो. त्यामुळे प्रतिभा आवर्जून त्या स्त्रियांबरोबर संवाद साधतात व वेळोवेळी भेटी घेतात.
_edited_edited.jpg)




